Wednesday, November 8, 2017

बोलावे आणि बोलू द्यावे !


‘बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांशा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव, हे सारं बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या ह्या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवाने तो मुका असला तर खुणांनी बोलतो. रंगरेषांच्या साहाय्याने बोलतो. नादातून बोलतो. हावभावांनी बोलतो. कधी कधी जेंव्हा त्याला कुणालाही काहीही सांगू नये, कुणाशी बोलू नये अस वाटत त्यावेळी सुद्धा ‘हल्ली मला कुणाकुणाशी बोलू नये असं वाटतं’ हे तो दहा जणांना बोलून दाखवतो. जगण्यात अर्थ नाही हे बोलून दाखवतो-जगण्यातच अर्थ आहे हे बोलून दाखवतो. तो स्वतःविषयी बोलतो. दुसऱ्याविषयी बोलतो. खरं बोलतो. खोटं बोलतो. वर्तमान, भूत, भविष्य ह्या तिन्ही काळांविषयी बोलतो. म्हणूनच कुणाला तरी काहीतरी सांगावसं वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मग ते तोंडाने बोलून सांगो, की लेखणीच्या साहाय्याने कागदावर बोलून सांगो. जीवनात कुणापासून दुरावल्याचं दुःख, ‘काय करणार ?तिथे बोलणच संपल’ अशा उद्गारांनीच तो व्यक्त करतो.
                                    
                    मरण म्हणजे तरी काय ?बोलणं संपणं !


मला स्वतःला अबोल माणसांचं भारी भय वाटतं. निर्मळ मनाची माणसं भरपूर बोलतात, कमी बोलणं हे मुत्सद्दीपणाचं लक्षण मानले जाते. ते खरंही असेल. धूर्त माणसं कमी बोलतात आणि मूर्ख माणसं जरा अधिक बोलतात, हेही खोट नाही. काही माणसं दिवसभर नळ गळल्यासारखी बोलतात. काही उगीचच तारसप्तकात बोलतात. अति सर्वत्र वर्जयेत् तेव्हा असल्या अतींचा विचार करायचं कारण नाही. पण गप्पांच्या अड्डयात मोकळेपणाने भाग घेणारा माणूस माझ्या दृष्टीने तरी निरोगी असतो.

अड्डा म्हटला की तिथे थट्टा-मस्करी किंवा गैरहजर माणसाची निंदा चालायचीच. शिवाय निंदेने जसा भुर्रकन वेळ जातो तसा स्तुतीत जात नाही. फक्त त्या निंदेमागे त्या गैरहजर माणसाला माणसातून उठवण्याचा हेतू नसावा. टीकेत तसं काही वाईटचं असतं अस मानण्याचं कारण नाही. तसे आपण सर्वच थोडयाफार प्रमाणात टीकाकार असतोच. आपलं संबंध दिवसाचं बोलणं जर ध्वनिमुद्रित केलं तर त्यात आपण टीकाकाराचीच भूमिका अधिक वेळ बजावित असल्याचं दिसेल. अगदी साध्यासुध्या जेवणाची तारीफ करताना सुद्धा ! स्वतःच्या कुटुंबाने केलेल्या कांदेबटाटयाच्या रश्श्याची तारीफ करताना देखील, ‘नाहीतर त्या दिवशी त्या कुलकर्ण्यांच्या बायकोने केलेला रस्सा. तो काय रस्सा होता? ‘कांदेबटाटयाचा लगदा’ अशी टीकेची पुरवणी जोडल्याखेरीज त्या साध्या पावतीची स्टॅम्प्ड रिसीट होत नाही. बोलण्याच्या पद्धतीचा स्वभावाशी आणि एकूण वागण्याशीही फार जवळचा संबंध असतो.

बेतास बात किंवा टापटिपीने बोलणारी माणसं पोशाखात सुद्धा टापटीप असतात.

अघळपघळ बोलणारी माणसं कडक इस्त्रीबाज नसतात.

रँ रॅं बोलणारी माणस कामातही रँ रँ असतात.

तर तुटक बोलणारी स्वभावानेच तुटक असतात.

काही माणसं ठराविक मंडळीतच खुलतात. जरा कोणी अपरिचित माणूस आला की गप्प, असल्या माणसांच्या जेवणाखाणापासून ते कपडयापर्यंतच्या आवडीनिवडी ठरलेल्या आहेत हे ओळखावं. त्यांना वांग आवडत नसल तर ते उपाशी उठतील.

पण कुठल्याही कंपूत रमणारा माणूस कुठल्याही पद्धतीच्या भोजनाचाही मस्त आस्वाद घेणारा असतो. असल्या माणसांना बोलायला कुणीही चालत. बोलायला चालत म्हणण्यापेक्षा ऐकायला कुणीही असल तरी चालतं.

काही माणस मात्र फक्त आपल्यालाच बोलायचा हक्क आहे, असं समजून बोलत असतात. विशेषतः राजकारणातली आणि साहित्यातली! त्यातून त्यांच्या तोंडापुढे मायक्रोफोन असला तर हा व्यवहार दुतर्फी करायची सोयच नसते. संघटित प्रयत्नांनीच ते बोलणं थांबवता आलं तरच त्यातून सुटका असते. ‘परिसंवाद’ नावाच्या प्रकारात तर असले वक्ते काव आणतात.

अशाच एका परिसंवादात एक साहित्यिक विदुषीबाई बोलायला उभ्या राहिल्या, (त्यांनी पुस्तक वगैरे लिहिलेली नाहीत. पण साहित्यसंमेलनांना नियमितपणाने वर्षानुवर्षे उपस्थित राहिल्यामुळे साहित्यिक) प्रत्येक वक्त्याला फक्त दहा मिनिटांचाच अवधी देण्यात आल्याचा मंत्र अध्यक्षांनी दिला होता. बाईंनी सुरूवात केली आणि त्या आवरेचनात. पंधरा मिनिटानंतर अध्यक्षांनी घंटी वाजवली. बाईंनी ढीम लागू दिली नाही. कारण तोपर्यंत त्या ‘इतक्या थोडया वेळात हा विषय मांडणे शक्य नाही तरी मी आता मुख्य विषयाकडे वळते’ इथपर्यंतच आल्या होत्या. पंचवीस मिनिटानंतर अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवली. बाईंनी अध्यक्षांना, हा उगीचच घंटी वाजवण्याचा कसला भलता नाद लागलाय, अशा चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहून ‘आजच्या समाजात स्त्रियांची कशी मुस्कटदाबी होते आहे’ हा मुद्दा खुलवायला घेतला. काही वेळाने अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवल्यावर बाईंनी त्यांच्यापुढील घंटी स्वतः उचलून हातात घेतली आणि आपलं भाषण चालू ठेवलं.

पुरूषांपेक्षा बायका अधिक बोलतात हा बायकांच्यावर अकारण केलेला आरोप आहे. वास्तविक बायका अधिक बोलत नसून कमी ऐकतात एवढंच. त्यातून असलीच जर एखादी फार बोलणारी बायको तर तिला गप्प करण्याचा एक रामबाण इलाज आमच्या एका अनुभवी मित्राने शोधून काढला आहे. ‘‘शेजारच्या सरलाबाईंनी एक मेलं वाटीभर डाळीचे पीठ द्यायला किती खळखळ केली.’’ अशासारख्या प्रापंचिक विषयावर भाष्य सुरू झाले की आमचा मित्र एकदम आंतरराष्ट्रीय राजकारणात शिरून, ‘‘दक्षिण ऱ्होडेशियातलं कळलं का तुला ?’’ असा प्रश्न टाकून वंशव्देष किंवा इजिप्त-इस्त्राएल संबंध यात शिरतो. त्यामुळे वाटीभर डाळीच्या पिठाचा इश्श्यू क्षुद्र होऊन जातो. गरजूंनी हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण कळायला हवे असे नाही. ब्रह्ममायेसारखे ते एक अगम्य कोडे आहे. म्हणूनच ब्रह्ममायेवर कुठलेही अखंडविखंडानंद जसे मनाला येईल ते बोलतात;तसे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलावे. आंतरराष्ट्रीय राजकारण, ब्रह्मज्ञान आणि भुताटकी या विषयांवर काहीही बोलेले तरी खपते.

ते काही का असेना, पण माणसाने बोलावे. गडकऱ्यांची शिवांगी तिच्या रायाजीला म्हणते, ‘राया, मनात असेल ते बोल, मनात नसेल ते बोल.’ वरपांगी मोठं भाबड पण जरा अधिक न्याहाळून पाहिलं तर तसं फार खोल वाक्य आहे. मनात असेल ते बोलण्याचं धैर्य नसतं. म्हणून तर मनात नसेल ते बोलावं लागतं. व्यवहारात मनात असेल ते न बोलण्याच्या चातुर्यालाच अधिक महत्त्व असते. मुक्काम हलवण्याची चिन्हे न दाखवणाऱ्या पाहुण्याला ‘आता तुम्ही इथून तळ उठवावा’ म्हणायच धैर्य असलेले नरकेसरी ह्या जगात किती सापडतील ? मनात नसेल तेच बोलायची माणसावर ‘संस्कृती’ किंवा सभ्यतेने सक्ती केलेली असते.

आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातली आपण पात्र आहोत. इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककाराने ह्या रंगभूमीवर आपल्याला ढकललेले आहे याचा अजूनही कुणाला थांगपत्ता लागलेला नाही आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. न बोलून सांगता कुणाला अशी अवस्था आहे.

राजेशाहीच्या काळात ‘राजा बोले दळ हाले’ अशी अवस्था होती. लोकशाहीच्या काळात तर लोकांनीच बोलले पाहिजे. आता तलवारीच्या पट्टयाची जागा जिभेच्या पट्टयाने घेतली आहे. इथे न बोलून राहण्यापेक्षा बोलून बाजी मारणारा मोठा, मात्र ह्या असल्या बोलण्याच्या कलेच्या अभ्यासात न बोलण्याची कलासुद्धा आत्मसात करावी लागते. नाहीतर न बोलून मिळालेली सत्ता बोलून घालवली असंही होत. ‘कला’ म्हटल्यावर बोलण्याच्या कलेलाही इतर कलांचे नियम आले.
    ‘‘कला ही प्रत्यक्ष प्रकट करण्याइतकीच दडपण्यातून प्रकट होत असते.’’

कधी कधी भानगडीच्या राजकीय परिस्थितीत नेत्यांच्या वक्तृत्वापेक्षा नेत्यांचं मौन अधिक बोलकं असतं. उत्तम गायकाला गाणं किती गावं याबरोबरच कधी संपवाव हे कळणं आवश्यक असते आणि बोलणाऱ्याप्रमाणे लिहिणाऱ्यालाही लिहिणं संपवावं कधी तेही कळायला हवं. म्हणून हे बोलण्याबद्दलचं लिहिणं विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळीत थोडा फेरफार करून संपवताना मी एवढंच म्हणेन की –

                     बोलणाऱ्याने बोलत जावे

                     ऐकणाऱ्याने ऐकत जावे

                     कधी कधी बोलणाऱ्याने

                    ऐकणाऱ्याचे कान घ्यावे.


कालनिर्णय दिनदर्शिका 
जानेवारी १९७९ 
पु. ल. देशपांडे

मुळ स्रोत -- https://kalnirnay.com/blog

0 प्रतिक्रिया: