Saturday, June 17, 2017

पु.ल. गेले तेव्हा.. - मुकेश माचकर

दोन हजारचा जून महिना.

पुलंच्या आजारपणाच्या बातम्या येत होत्या. हे शेवटचंच आजारपण ठरेल अशी शक्यता होती. ते पुण्यात डेक्कनवर प्रयाग हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूमध्ये होते. तेव्हा पुण्यात मटाचे प्रतिनिधी असलेल्या गोपाळराव साक्रीकरांनी, पुलं खरंतर गेलेच आहेत, तसं जाहीर करत नाहीयेत, अशा आशयाची बातमी लिहिली होती बहुतेक. त्यावरून बराच गोंधळ उडाला होता. पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं...

...महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांनी मला सांगितलं, पुण्याला जा. पुलं क्रिटिकल आहेत. साक्रीकर एकटेच आहेत. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून आता काय देता येतील त्या बातम्या दे. पुलं अचानक गेले, तर आपण बातमीदारीत कमी पडायला नको...

मी ११ जूनच्या सकाळी प्रयागला पोहोचलो. एका कोपऱ्यातल्या खोलीत पुलंना ठेवलं होतं. खिडकीतून त्यांचं दर्शन होत होतं. असंख्य नळ्या आणि यंत्रणा लावलेला अचेतन देह. पुलंचे स्नेही मधू गानू हे तिथे दिवसरात्र होते. सुनीताबाई जाऊन येऊन होत्या. जब्बार पटेलही अनेक दिवस तिथेच मुक्काम टाकून होते. अन्य स्नेहीमंडळी येऊन जाऊन होती. पुण्यातल्या आणि बाहेरच्या अनेक वर्तमानपत्रांचे वार्ताहर प्रयागच्या परिसरात येऊन-जाऊन होते. काही फोनवरून खबर घेत होते. टीव्ही पत्रकारिता फोफावलेली नसल्यामुळे ‘पुलंनी अचानक श्वास घेतला’, ‘एक नळी निसटली’, ‘पुलं मृत्युशय्येवर असताना सुनीताबाई कुठे आहेत’, ‘पुलं जिवंत आहेत का’, अशा थरारक आणि रोचक सवालांनी भरलेल्या ब्रेकिंग न्यूज आणि वार्तापत्रांना तेव्हाचा महाराष्ट्र मुकला होता.

साक्रीकरांनी आधी दिलेल्या अनुचित बातमीने मटाची बदनामी झाली, असं उघडपणे म्हणणारा प्रत्येकजण खासगीत मात्र ती बातमी खरीच होती, असं सांगत होता. पुण्यात सांस्कृतिक उठबस असलेल्या एका सत्ताधारी नेत्याच्या तोंडूनच साक्रीकरांनी प्रयागमध्येच हे ऐकलं होतं. त्यात तथ्यही असण्याची शक्यता होती. पुलंचा लाडका भाचा दिनेश परदेशात होता. त्याला यायला काही दिवस लागणार होते. त्याच्यासाठी अंतिम संस्कार थांबवायचे, तर पुलंना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवणं आवश्यक होतं. तोपर्यंत हॉस्पिटलने ‘आज प्रकृती सुधारली,’ ‘आज पुन्हा चिंताजनक झाली,’ अशा प्रकारची तांत्रिकदृष्ट्या बिनचूक हेल्थ बुलेटिन काढत राहणंही आवश्यक होतं... अर्थात, यातलं खरंखोटं अधिकृतपणे कोणीही कधीच सांगितलं नाही... त्यावरचं संशयाचं धुकं कधीच हटलं नाही...

...मी प्रयागसमोरच्या फुटपाथवर मुक्काम टाकला. श्रीपाद ब्रह्मेसह पुण्याच्या पत्रकारितेतले बरेच यारदोस्त तिथे भेटत होते. जवळ गुडलकला चहाची आचमनं होत होती. दिनेश रात्री उशिरा पोहोचणार, अशी खबर होती. त्यानंतर काहीही होऊ शकलं असतं.

तेव्हाचं राजकीय-सामाजिक वातावरण ढवळलेलं होतं. राज्यात युतीचं सरकार जाऊन नुकतंच आघाडीचं सरकार आलं होतं. पुलंनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार स्वीकारताना युती सरकारला चार खडे बोल सुनावले होते. त्यावर युतीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मोडका पूल’ ही त्यांना आणि त्यांच्या भक्तगणांना साजेशी कोटी केली होती. तेव्हा फेसबुकादि सोशल मीडिया नसल्याने, सरकारचा पुरस्कार स्वीकारताना सरकारवर टीका करण्याचा ‘देशद्रोह’ केलेल्या पुलंना पाकिस्तानात किंवा गेलाबाजार कर्नाटकात पाठवण्याच्या शिफारसींचा आगडोंब उसळण्याची सोय नव्हती. पण, पुलंनी सरकारची पंचाईत केल्यामुळे पुलंचं गारुड ओसरलेला किंवा त्याचा स्पर्श न झालेला आणि ठाकरेंच्या मोहिनीमध्ये गुरफटलेला हुच्च वर्ग ‘कोण पुलं? यांना विचारतो कोण, ते त्यांच्याजागी मोठे,’ मोडमध्ये गेला होता. जवळपास दशकभरात पुलंच्या अष्टपैलू प्रतिभेचं दर्शन घडवणारा एकही ठसठशीत ताजा आविष्कार समोर आला नव्हता, त्यामुळे पुलंमय झालेली पिढी जुनी झाली होती. अर्थात, पुलंची प्रकृती बिघडल्यानंतर आणि त्याच्या अटळ परिणतीची जाणीव झाल्यानंतर बाळासाहेबांनी प्रयागमध्ये जाऊन पुलंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ते आपले शिक्षक होते, अशी आठवण सांगितली. पुलंच्या थोरवीचे गोडवेही गायले. पुलंचे स्नेही राम कोल्हटकर यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार पुलंच्या अंतिम यात्रेत ‘माझिया माहेरा जा रे पाखरा’ हे पुलंच्या संगीतात ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं गीत वाजवावं, अशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सूचना होती. ती ऐकून पुलंचे स्नेही त्याही स्थितीत हतबुद्ध झाले आणि त्यांना हसू कोसळलं. मधू गानूंनी हे सुनीताबाईंच्या कानावर घातल्यावर त्यांनी कलेक्टरना फोन करून हे असलं काही करायचं नाही, अशी तंबी दिली. आघाडी सरकारने पुलंवर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं होतं... पण, सुनीताबाईंनी त्याला नकार दिला होता...

...त्यामुळेच काहीही घडण्याची शक्यता होती...

...सुनीताबाई निर्धारी वृत्तीच्या होत्या... उत्तररात्री दिनेश आल्यानंतर पुण्याला जाग येण्याच्या आत पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन जातील, अशी साधार भीती अनेकांना वाटत होती... प्रयागमध्ये नळ्या लावलेला देह हे आता पार्थिवच आहे, याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती...

...रात्र झाली, तशी गर्दी ओसरली... डेक्कन असल्याने बारापर्यंत जाग होती... नंतर रस्ताही सुनसान झाला... पुण्यातले नवेजुने आठनऊ रिपोर्टर, प्रतिनिधी आणि मी प्रयागसमोरच्या फुटपाथवर होतो... आम्ही सगळे दिनेशच्या येण्याकडे डोळे लावून होतो... त्याचं विमान मध्यरात्रीच्या आसपास लँड होणार होतं... त्याला पुण्याला आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल दिला गेला होता... म्हणजे मुख्यमंत्र्यांची गाडी ज्या प्राधान्याने प्रवास करते, ते प्राधान्य आणि पुढेमागे लाल दिव्याच्या गाड्या वगैरे... ही व्यवस्था ज्या क्षणी स्वीकारली गेली असेल, त्या क्षणीच सुनीताबाईंनी सरकारी इतमामही स्वीकारला असणार... त्यांच्या मनधरणीची जबाबदारी जब्बार पटेलांवर असावी... पुलंवर तुमच्याइतकाच महाराष्ट्राचाही प्रेमाचा अधिकार आहे, असं त्यांनी सुनीताबाईंना पटवून दिलं...

...मध्यरात्रीच्या आसपास सुनीताबाई तिथे आल्या... जब्बार होते... ते बाहेर येऊन गप्पा मारताना म्हणाले, सुनीताबाईंना भेटलास का? पुलंना पाहिलंस का?

मी म्हणालो, त्या खिडकीतून पाहिलं.

ते आत घेऊन गेले. निश्चेष्ट, चैतन्यहीन शरीराचं दर्शन घेतलं आणि मनातून पुसून टाकलं... पुलंचा सचेतन चेहरा, आवाज आणि ते मिष्कील, खोडकर हसूच आठवणीत ठेवायचं होतं... जब्बारांनी सुनीताबाईंना ओळख करून दिली... मी एक रूपाली या पुलंच्या घरी पुलंची भाषणं उतरवायला गेलो होतो, त्याची आठवण करून दिली... अगदी अलीकडच्या काळात आल्हाद गोडबोलेंबरोबर धावती भेटही झाली होती मालती-माधवमध्ये... त्याची आठवण करून दिली... सुनीताबाई बाहेरून नॉर्मल दिसत होत्या... आत मात्र सगळं काही ठीक नसावं... हेही समजत होतं...

...रात्री तीन-साडेतीनच्या सुमारास सायरनचा आवाज येऊ लागला, दूर लाल दिवा दिसू लागला...

दिनेश आला होता... तो येतोय हे कळल्यामुळे दोनपाच मिनिटं आधी मधू गानू, सुनीताबाईही आल्या होत्या... दुधाला निघालेले काही पुणेकर आणि पेपरवाले यांचं कुतूहल जागवत दिनेश मोटारीतून उतरला आणि तडक पुलंच्या खोलीकडे गेला... आम्हीही मागोमाग धावलो... पण, हा अत्यंत खासगी असा क्षण असल्यामुळे वार्ताहर आत घुसले नाहीत, आम्ही सगळे खिडकीपाशीच थांबलो... पुलंच्या देहासमोर उभं राहून दिनेश बराच काळ त्यांच्याकडे पाहात होता... मग तो काहीतरी बोलू लागला... ती रवींद्रनाथांची एक कविता होती, अशी माहिती नंतर मिळाली...

...दिनेश आला तसाच गेला, त्याच्याबरोबर सुनीताबाई आणि मधुभाईही गेले... सगळेच गेले... पुलंपाशी आता आमच्याशिवाय कोणीच नव्हतं... पुढे काय होणार, हे स्पष्ट होतं...

...आता ते कधी परतणार आणि काय निर्णय करणार, एवढाच प्रश्न होता...

... आम्हीही चहानाश्त्यासाठी गुडलककडे वळलो... नंतर काही काळ परिस्थिती तशीच राहिली... पुलं अजूनही ‘जिवंत’च होते, त्यामुळे फ्रेश होण्यासाठी घरी गेलो... अंघोळ-नाश्ता करून थोडी झोप काढण्यासाठी आडवा झालो, तोच फोन घणघणला... पलीकडे केतकर होते... म्हणाले, तू घरी कसा? म्हटलं आताच आलोय... रात्रभर तिथेच होतो... ते म्हणाले, निधन घोषित झालंय... गो बॅक. दिनेश येऊन गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे लाइफ सपोर्ट सिस्टम काढण्याचा निर्णय झाला होता... ती काढल्यानंतर अटळ ते घडलं होतं...

नऊला पुन्हा प्रयागला गेलो, तोवर तिथला सगळा माहौल बदलला होता... पार्थिव साडेसहालाच मालतीमाधवला नेण्यात आलं होतं... सरकारी इतमाम स्वीकारण्यात आल्यामुळे मालतीमाधवच्या प्रांगणात अंत्यदर्शनाची व्यवस्था झाली होती... लोकांच्या रांगा लागल्या होत्या... मुंबई दूरदर्शनचे मुकेश शर्मा हे केंद्र संचालक स्वत: तिथे हजर झाले होते... पुलंच्या अंत्ययात्रेचं थेट प्रक्षेपण होणार होतं... सुधीर गाडगीळ लाइव्ह निवेदन करणार होते... पांढरं शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट, अशी जितेंद्रछाप वेशभूषा केलेल्या, फिल्मी नटासारख्या दिसणाऱ्या आणि तसेच वागत असलेल्या शर्मांना औचित्य नाही का, असा प्रश्न पडत होता... पण, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या अंतिम यात्रेसाठी त्यांनी केलेली अद्वितीय तयारी पाहता तसं म्हणणंही धाडसाचं ठरलं असतं...

...दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्ययात्रा निघाली, ती शववाहिनीतून. रस्त्याकडेला तुरळक गर्दी होती. वैकुंठ स्मशानभूमीत पुलंच्या पार्थिवासमोर पोलिसांनी फैरी झाडलेल्या पाहून पुलं उठून काहीतरी समर्पक कोटी करतील, असं वाटत होतं... गर्दी नियंत्रित करण्यासाठी माइकवरून बोलणाऱ्या जब्बार पटेलांनी ‘भाईंच्या मागे कोणीही जायचं नाहीये’ असं अनाहूतपणे म्हणून अनपेक्षित हशा पिकवला, तेव्हा परीटघडीचं अवघडलेपण वितळलं... मृत्युचं सावट हललं आणि पुलंची अंतिम यात्रा पुलंच्या अंतिम यात्रेला साजेशी होऊन गेली...

...मटाने पुलंच्या निधनाच्या बातमीला गोपाळ साक्रीकर/मुकेश माचकर अशी बायलाइन दिली होती. हा केतकरांचा निर्णय होता. मराठीत ही अभूतपूर्व घटना होती. अनेकांनी त्यावर टीकाही केली. बायलाइनचा आग्रह जणू आम्ही धरला असावा, अशी आमच्याबरोबर वार्तांकन करणाऱ्या आणि त्यांच्या वर्तमानपत्रांत बायलाइन न मिळालेल्या वार्ताहरांची साहजिकच समजूत झाली होती... मुंबईला परतल्यानंतर केतकरांना विचारलं, तुम्ही ही अशी पंचाईत का केलीत? फार कानकोंडे झालो आम्ही.

केतकर म्हणाले, पुलंचं निधन ही महाराष्ट्रासाठी केवढी मोठी घटना होती, हे समजावं, यासाठी बायलाइन दिली. ते आकस्मिक नव्हतं. वर्तमानपत्रं युद्ध कव्हर करायला बातमीदार पाठवतात. त्यांच्या बायलाइन छापतात. आपण या घटनेला स्वतंत्र माणूस पाठवून कव्हर करण्याइतकं महत्त्व देतो, हे त्यातून सांगायचं असतं. पुलंचं निधन ही सांस्कृतिक क्षेत्रातली त्याच तोलामोलाची घटना आहे. म्हणून ही बायलाइन.

या लेखाच्या निमित्ताने केतकरांशी बोलणं झालं, तेव्हा आणखी एक गोष्ट प्रकाशात आली. पुलंच्या निधनाच्या अंकाची आखणी सुरू असताना दुपारी केतकरांच्या हातात अंकाची अॅड डमी आली... म्हणजे जाहिराती कोणत्या पानावर कशा आहेत, याची रचना केलेली डमी. त्यात शेवटच्या पानावर ‘आनंदोत्सवात सामील व्हा’ अशी हेडलाइन असलेली फुल पेज

अॅड होती. पुलंच्या निधनाचा अंक आणि मागच्या पानावर ‘आनंदोत्सवात सामील व्हा...’??

केतकर उठून प्रदीप गुहांकडे गेले... त्यांना अडचण सांगितली... गुहा म्हणाले, मी परदेशात जायला निघालोय. दिल्लीशी बोलून घ्या.

केतकरांनी दिल्लीला फोन लावला... तिथे जाहिरात विभागप्रमुख बंगाली होता. त्याला सांगितलं. तो म्हणाला, कोलकात्याशी बोलावं लागेल. क्लायंट तिथला आहे. पण, अडचण काय आहे?

केतकरांनी पुलंच्या निधनाबद्दल सांगितलं तर त्याने विचारलं, हे इतके मोठे गृहस्थ होते का? अगदी अशी एक जाहिरातही जाऊ नये इतके मोठे होते?

केतकर म्हणाले, सुदैवाने तुम्ही बंगाली आहात, तर समजू शकाल. आज टागोरांचं निधन झालं असतं, तर आनंदबझार पत्रिकेत अशी जाहिरात छापून आली असती का?

त्या अधिकाऱ्याने केतकरांना सांगितलं, कोलकात्याच्या अधिकाऱ्याला बोलायला सांगतो.

त्या अधिकाऱ्याने फोन केल्यावर केतकरांनी त्यालाही तेच सांगितलं... तो म्हणाला, पण, पुलं आम्हाला माहिती नाहीत.

केतकर म्हणाले, पुलं हे तेंडुलकरांप्रमाणे भारतभरात माहिती झाले नाहीत. ते कायम महाराष्ट्रीयच राहिले. सत्यजित राय यांच्या निधनाच्या दिवशी अशी जाहिरात औचित्यपूर्ण ठरेल का?

...ती जाहिरात रद्द झाली आणि पुलंच्या निधनाच्या आधीपासूनच लिहून तयार असलेले लेख आणि फोटो त्या पानावर गेले.

केतकरांच्या नेतृत्वाखालच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पुलं गेल्याची बातमी कशी येते, याचं अनेकांना कुतूहल होतं... हा पुलंचे स्नेही असलेल्या गोविंद तळवलकरांचा मटा नव्हता, हे त्याचं कारण होतं...

...कुमार केतकर मटाचे संपादक झाल्यानंतरच्या काळात, पुलंच्या पुस्तकांसाठी त्यांची भाषणं कॅसेटवरून उतरवून घेण्याच्या कामासाठी एकदा भल्या सकाळी पुलंच्या घरी, त्यांच्या त्या सुप्रसिद्ध काळ्या कोचावर बसण्याचं भाग्य लाभलं होतं. पुलं आणि सुनीताबाईंबरोबर एकदा नाश्ताही केला. तेव्हा पोहे छान झालेत, असं सांगितल्यानंतर सुनीताबाईंनी ‘शेजारच्या एसेम जोशी हॉस्पिटलच्या कँटीनमधून येतात,’ असं सांगितलं होतं. त्यांच्या आजारामुळे हात थरथरायचे. भांडंही हातात धरता येत नसे. त्यामुळे स्वयंपाक बंद होता. नातेवाईकांकडून जेवणाचा डबा येत होता. आता पुढे त्यांच्याशी काय बोलायचं याचा विचार करत असताना मटाचा विषय निघाला आणि गोविंद तळवलकरांनी संपादकपद सोडल्यानंतर पुलं आणि सुनीताबाईंचं मटाबरोबरचं मैत्र संपुष्टात आलं होतं, हे लक्षात आलं. त्या म्हणाल्या, तळवलकरांशी आमचा स्नेह होता. केतकरांशी तसा संपर्क नाही. आता वयोमानाप्रमाणे पेपर पाहिलाही जात नाही. केतकरांनी पुलंवर कधीतरी खरपूस टीका केली होती. तिचा संदर्भ त्या दुराव्याला असावा.

...त्याच केतकरांनी पुलंचं निधन कव्हर करण्यासाठी खास वार्ताहर पाठवला... पुलंवरचा त्या दिवशीचा सर्वोत्तम अग्रलेख त्यांनी लिहिला... त्यात आपण पुलंचं मोठेपण समजण्यात चूक केली, अशी खुली कबुली दिली... दुसऱ्या दिवशी ‘प्रिय सुनीताबाई’ असा आणखी एक अत्यंत हृदयस्पर्शी अग्रलेख लिहून त्यांनी जबरदस्त षटकार मारला, सगळे दुरावे एका फटक्यात वितळवून टाकले... सुनीताबाई आणि मटा यांच्यातला स्नेह पुन्हा दृढमूल झाला...

पुलंच्या निधनाचा मटाचा अंक कलेक्टर्स इश्यू ठरला... तो त्या दिवशी ब्लॅकने विकला गेल्याची चर्चा होती... दुसऱ्या दिवशी तर तो पंधरा-वीस रुपयांना मिळत होता म्हणे तो...

पुलंच्या प्रत्येक स्मृतीदिनाला ती रात्र आठवत राहते... पुलंचा अचेतन देह पाहिला तेव्हाच विसरलो होतो... ते पुलं नव्हतेच... लक्षात राहिली ती पुलंना रवींद्रनाथांची कविता ऐकवणाऱ्या दिनेशची धीरगंभीर मूर्ती...

-- मुकेश माचकर

मुळ स्रोत -- http://www.bigul.co.in/bigul/1082/sec/8

’पु.ल. प्रेम’ ब्लॉगसाठी लेख उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकेश माचकरांचे अनेक धन्यवाद !!  

3 प्रतिक्रिया:

मुकेश माचकर said...


Unknown said...

वा



मन भरून आले

आमोद घांग्रेकर said...

मी हा लेख आता पहिल्यांदा वाचला खूप छान लिहिलंय पाणी आलं डोळ्यात कारण हे सगळं माहीत नव्हतं मला आज ह्या ब्लॉग मुळे समजतंय थँक्स थँक्स