Monday, April 24, 2017

पु, ल. नावाचं मोरपीस


नेहमीप्रमाणं धावत-पळत "डेक्कन‘ गाठली. हुश्‍शहुश्‍श करत विसावतो तर काय, समोरच्या खिडकीत "पु.ल.‘ चक्क एकटेच बसलेले. यापूर्वी अनेकदा त्यांच्या सहवासाचा, पंक्तीचा योग आला, पण मनसोक्त गप्पा रंगल्याच नव्हत्या. आता त्याची संधी मिळाली अन्‌ चार तास आनंदाचा ठेवा लुटत राहिलो.

नोकरीच्या काळात 1970 ते 90 च्या दरम्यान डेक्कन क्वीनमधून प्रवास सतत व्हायचा. तेव्हाचं डेक्कन क्वीनचं रूप खूपच वेगळं होतं. एअरकंडिशन डबे नसले तरी ऐसपैस जागा असायची. एका ओळीत चार सीट्‌स असल्यानं सध्यासारखं दाटीवाटीनं बसण्याचा प्रश्‍नच नव्हता. तो प्रवास मजेचा असायचा. दिवसभराचं काम ओटापून संध्याकाळी डेक्कन क्वीन गाठायची आणि त्या सिंहासनासारख्या आसनावर दमलाभागला देह लोटून द्यायचा. गाडी सुटता सुटता कॅफेटेरियाचा वेटर आला, की त्याला ऑम्लेट किंवा फ्राइड फिशची ऑर्डर द्यायची आणि ठाण्यापर्यंत समोरची प्लेट संपली, की डोळे मिटून आत्मचिंतन (?) करताना मस्तपैकी झोप लागायची ती कर्जत येईपर्यंत. मग पाय मोकळे करायला खाली उतरायचं आणि त्या प्रसिद्ध वड्याचा आस्वाद घेईपर्यंत, मागचं इंजिन लागल्यावर गाडी प्रस्थान करायची. मग काय, घाट सुरू झाल्यावर कितीही वेळा पाहिलं तरी समाधान न होणारी खंडाळ्याच्या दरीची शोभा पाहण्यात मन गुंगून जायचं.

एकदा गाडीला उशीर झालेला असताना गाडी घाट चढायला लागेस्तोवर रात्र होऊन गेली होती. पौर्णिमेची ती रात्र होती आणि निरभ्र आकाशातल्या धवल शुभ्र चांदण्यानं संपूर्ण दरी भरून गेली होती. देवादिकांना दुर्लभ अशा त्या दृश्‍यानं मी भारावून गेलो होतो. जगाचं रहाटगाडगं जिथल्या तिथं थांबून तो क्षण तिथंच गोठून जावा, असं वाटलं होतं. पावसाळ्यात तर काय, त्या वनश्रीला बहार आलेला असायचा. किती नटू आणि किती नाही, असं त्या दरीला व्हायचं. हिरव्या पाचूंची सगळीकडं उधळण झालेली दिसायची. त्यातून पांढरे शुभ्र धबधबे. कुठं धुक्‍याची शाल आणि ढगांचा संचार! वाटायचं, हा सुखद गारवा सतत अंगाला लपेटून ठेवावा. अशा वेळी गप्पा मारायला समविचारी सहप्रवासी असला, की बघायलाच नको. लोणावळा गेलं, की पुढचा प्रवास मात्र कंटाळवाणा! घाट चढून आल्यावर घरचे वेध लागलेले असायचे. मग कधी एकदा शिवाजीनगर येतंय आणि धावत जाऊन रिक्षा पकडतोय, असं व्हायचं. आता मात्र त्या बंदिस्त एसी डब्यात अंग चोरून बसल्यावर फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं एवढाच कर्मभाव उरतो. काळ्या काचांमुळं बाहेरची शोभाही पाहता येत नाही आणि बुफे कारचा तो भूक प्रज्वलित करणारा संमिश्र वासही दुरावलाय. प्रवासाची मजाच संपली.

असंच एकदा एका पावसाळी संध्याकाळी धावत-पळत डेक्कन क्वीन गाठली. त्या दिवशी माझ्या कुंडलीतले सर्व शुभ ग्रह एकवटले असावेत. गाडीला अगदी तुरळक गर्दी आणि डब्यात आपल्या सर्वांचं आराध्यदैवत, साक्षात पु.ल. खिडकीशी चक्क एकटे बसलेले, त्या वेळी ते एन.सी.पी.ए.मध्ये पदाधिकारी होते. तशी माझी त्यांच्याशी बरीच चांगली ओळख होती. त्यांचे अतिशय जवळचे सहायक मित्र (कै.) मधू गानू आमच्या नात्यातले असल्यानं आमचं पु.ल. आणि सुनीताबाई यांच्याकडे येणं-जाणं होतं. त्यांच्या पंक्तीचा लाभही आम्हाला झाला होता. माझी पत्नी सौ. सुजाताच्या पदन्यास नृत्यसंस्थेच्या "गीत गोपाळ‘ या नृत्यनाट्याच्या कार्यक्रमालासुद्धा ते आवर्जून आले होते आणि नंतर सर्व कलाकारांशी त्यांनी संवाद साधला होता. तरी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचा योग आला नव्हता, असो. तर मी त्यांच्याजवळ जाऊन, नमस्कार करून त्यांना ओळख दिली. दिलखुलास हसून त्यांनी मला शेजारी बसण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतरचा चार तासांचा पुण्यापर्यंतचा विनाव्यत्यय प्रवास म्हणजे स्वर्गलोकीच्या गंधर्वांनी हेवा करावा, असा झाला.

अजूनही त्या सुखद आठवणींचं मोरपीस अंगावरून फिरतं. मी "पु.ल.‘ यांच्या लिखाणाचा भोक्ता असल्यानं अनेक दाखले देत आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी "पार्ल्यामध्ये गेल्यावर शितू सरमळकरांचं वेलकम स्टोअर शोधण्याचा प्रयत्न केला होता,‘ हे सांगितल्यावर ते मिस्कीलपणे हसले. त्यांच्या "माझे खाद्य जीवन‘ या लेखाबद्दल मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही दिल्लीमधल्या छोले गल्ली आणि पराठा गल्लीबद्दल लिहिलंत, पण चांदणी चौकात अजून पुढे गेल्यावर असलेल्या ""काके दी हट्टी‘‘मध्ये मिळणारा रबडी फालुदा विसरून मला चालणार नाही.‘ हे ऐकल्यावर त्यांनी दिल्लीच्या पुढच्या ट्रीपमध्ये तिथे नक्की जाईन, असं सांगितलं. "व्यक्ती आणि वल्ली‘मधल्या दिनेशची आठवण निघाली. ""आता तो खूपच मोठा झाला असेल. मग तो त्या लेखातल्या (नंगू) फोटोमुळे रागवला नाही का?‘‘ असं विचारल्यावर, ""नाही नाही, आता तो अमेरिकेला असतो. आणि मला तपासणारा नाही, पण दुसऱ्याच विषयात डॉक्‍टर झाला आहे,‘‘ असं म्हणाले. त्यांना कर्जतचा वडा खूप आवडतो, हे माहीत असल्यानं मी तिथं उतरून तो आणल्यावर ते फारच खूष झाले. कर्जतला गाडी थांबली, की शेजारून, घाटात गाडीच्या मागे लागणारं "बॅंकर‘ इंजिन संथपणे जातं. ते बघितल्यावर मी "पु.ल.‘ना, चिं. वि. जोशी यांची त्यासंबंधित एक गोष्ट सांगण्याचं धाडस केलं. ""आलेलं इंजिन धापा टाकत गेलं आणि नवीन इंजिन मात्र संथपणे धूम्रपान करत उभं होतं,‘‘ ही वाफेच्या इंजिनांना त्या गोष्टीत दिलेली उपमा त्यांना फारच आवडली.

मी मूळचा मुंबईकर आणि पु.ल. यांचा पिंडही मुंबईकराचाच. त्यामुळे आमच्या मुंबईबद्दलच्या गप्पासुद्धा मस्त रंगल्या. एके काळी मलबार हिलवरून दिसणारं क्वीन्स नेकलेसचं रूप, दादरचा शांत स्वच्छ समुद्रकिनारा इत्यादी आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनीही त्यांच्या त्या वेळच्या पार्ल्याच्या आठवणी सांगितल्या. घरी आईकडं ते थालीपिठाचा आग्रह कसा धरत, थालीपिठाला मधे भोक पाहिजे, बरोबर लोण्याचा गोळा पाहिजे, वगैरे आठवणी भूतकाळात रंगून जाऊन सांगत होते. गप्पा रंगत होत्या, हा प्रवास संपूच नये, असं वाटत होतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच, या उक्तीप्रमाणे शेवटी पुणे स्टेशन आलं. गर्दीतून वाट काढत त्यांना रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांच्याशी हात मिळवत म्हटलं, ""आय एंजॉइड एव्हरी मोमेंट ऑफ द जर्नी टुडे.‘‘ यावर त्यांचं उत्तर ""सेम हिअर.‘ आणि रिक्षा चालू होताना ती थांबवून (माझ्या कानांवर माझा विश्‍वासच बसला नाही) म्हणाले, "आय मीन इट!‘ त्या महान व्यक्तिमत्त्वाचा तो चार तासांचा सहवास आणि त्यांचं घडलेलं आगळंच दर्शन, हा माझ्या आयुष्यातला न विसरण्याजोगा अनमोल ठेवा आहे.
- सुरेश नातू
मुळ स्रोत -- मुक्तपीठ

3 प्रतिक्रिया: