Monday, June 13, 2016

एक होता विदुषक

हा विदुषक जर आज हयात असता तर त्याने ९६ वर्षे पुरी केली असती. १५ वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या आवाजाने अखेरचा श्वास घेतला. प्रयाग चे अथक परिश्रम निकामी ठरले. मी त्या काळी मुंबईला असे. अखेरचा निरोप देण्यासाठी डेक्कन वरचा माणसांचा महापूर पेपरमध्ये पहिला. त्या गुरुतुल्य विदुषकाची प्रत्यक्षात भेट झाली नाही ह्याची सदैव हुरहूर राहील. त्यामुळे जवळच्यांसाठी ते भाई असतील, काहींसाठी पि. एल., पण आमच्यासाठी फक्त ‘पुलं’ राहिले.
माझे 'पुलं' संस्कार वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षा पासून सुरु झाले. आजुबाजू ला सतत कानी येई - पुलंचे पुस्तक, पुलंचे गाणे, पुलंची पेटी, पुलंची क्यासेट. माझ्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बाल मनाला वाटले कि ह्या माणसाचे नाव पु. लं. देशपांडे आहे, आणि तसे मी उच्चारूही लागलो. नंतर मला समजवण्यात आले की 'ल' लक्ष्मण चा, ‘लं’केचा नव्हे. असामी आसामी चे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर मला वाटले कि हे एक आसामी (आसाम मध्ये राहणारा) माणसाबद्दल असणार. त्या वेळी मी ते वाचायची हिम्मतही नाही केली. पितृकृपेने घरात पुलंची अनेक पुस्तके येत गेली, पण काही वाचायचा योग नाही आला. खरं तर हे आधीचं वाक्य लिहिताना जरा बरं दिसावं म्हणून लिहिले. पुलं काय आहेत ह्याची तेव्हा अक्कलच नव्हती. पण योग आला नाही म्हणलं कि कसं भारदस्त वाटतं. त्या नंतर एकदा गणपतीत टीव्हीवर "वाऱ्यावरची वरात" दाखवलं गेलं. त्यातला नाट्याविष्कार फार काही समजला नाही परंतु हास्याच्या सर्वोच्य स्थानावर अलगदपणे घेऊन घेणाऱ्या ह्या बादशाहचा जवळून परिचय झाला. पुढे कधीतरी विजया मेहतांनी ल्यामिंगटन रोड वरून पुलंबरोबर वरातीच्या तालमीला जातानाच्या उत्साहाचे वर्णन ऐकले, तेव्हा त्याची नशा काय असेल ह्याची कल्पना आली.

माझ्या किशोर अवस्थेत आणि पुलं हयात असताना माझी पोच असामी आसामी, पुलं एक साठवण, आणि क्यासेट मधल्या पुलंपर्यंत झाली. आमच्या शेजारच्या घाणेकरांनी जेव्हा मला "बहुरूपी पुलं" ऐकायला बोलावले, तेव्हा मी साफ नकार दिला होता . पुलंचे पेटीवादन ऐकणे ही कल्पनासुद्धा मला मान्य नव्हती. पुलं म्हणजे हसणे. त्यामुळे आल्यागेल्यांवर छाप पडावी म्हणून त्यांना असामी ऐकवणे, साठवण मधले मथळे ऐकवणे, हे कार्य सुरु केले. शाळेत असताना सदु आणि दादू चे नाटक सुचवून त्यात काम सुद्धा केले.

चाळीचा आणि व्यक्ती आणि वल्लीचा परिचय तसा नंतरचा काळ. चाळ तर आधी ध्वनी रूपातच बघितली. अपूर्वाई, पूर्वरंग, जेवे त्यांच्या देशा, हसवणूक, खोगीरभरती आजूबाजूला असून फक्त बघत होतो. नंतर कामानिमित्त एक वर्ष डोंबिवली ला गेलो असताना असामी नीट वाचलं. त्यातला वाचनातला एक प्रसंग आठवतो. पार्ल्याच्या मावशी चे घर शोधात असताना पुलंना एक म्हातारे ग्रहस्त भेटतात आणि त्यांचा पुलंच्या कुटुंबाशी भर रस्त्यात संवाद सुरु होतो. त्याच संवादात ते आजोबा शंकऱ्या ला विचारतात " काय नाव तुझं बाळ?" आणि शंकऱ्या म्हणतो " छत्रपती शिवाजी महाराज". वास्तविक तो एक पाटी वाचत असतो, पण ते इतक्या मजेशीर पणे लिहिले होते, कि मी अक्षरशः गडबडा लोळून हसत सुटलो. ते पाहून माझ्या त्याकाळचा रूम पार्टनर आनंदकुमारने माझ्याकडे ज्या नजरेने पहिले होते ते मला अजूनही आठवत आहे.

त्यानंतर पुलंची पुस्तके आणि वाचन दोन्ही वाढत गेल्याचे आता स्मरते. पुलंशी नाते वाढत चालले असता ज्या माणसाने सगळ्यांना जन्मभर हसवत ठेवलं, त्यानी साऱ्यांच्या डोळ्यात अचानक आसवे उभी केली. दुर्दैवाने पुलं गेल्यानंतर पुलं जास्त उमगले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू समोर येऊ लागले.

बहुरूपी पुलं ऐकण्यासाठी आता धडपडू लागलो. त्यांची भाषणे ऐकण्याचा सपाटा सुरु केला. मित्रहो, श्रोतेहो, रसिकहो, गणगोत, मैत्र, उरलंसुरलं, शांतीवन मध्ये नव नवीन पुलं पाहायला मिळाले, आणि लक्षात आले कि ह्या माणसाचा विस्तार केवढा मोठा आहे. पुलंच्या विचारांचा प्रभाव दैनंदिन जगण्यावर आपसूक पडू लागला. पुस्तकांची पारायणे होऊ लागली. प्रत्येक वेळेस नवीन बोध होऊ लागला. चाळीचे चिंतन मनात कोरले गेले. असामी आसामी मधला " In tune with the tune" लिहिणाऱ्या इसमाचे पहिले वाक्य " गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे" आणि त्याचेच शेवटचे वाक्य " पण गुरूदेवांचा बहुबल आहे, सगळीकडे वशिलेबाजी आहे साहेब" ह्यातला मार्मिकपणा दिसू लागला. गजा खोत आणि सखाराम गटणे सोडले तर, प्रत्येक व्यक्तीचा (किंवा वल्लीचा) आत्मविश्वास प्रखरपणे समोर येऊ लागला. एक शुन्य मी ने एक वेगळ्या पुलंचे दर्शन घडवले. माणसातल्या माणूसपणाचे दर्शन झाले. तात्पर्य काय, मी पुलकित झालो.
पुलंचे बालगंधर्वांवर झालेले भाषण ऐकून खरंतर नाट्यसंगीत आणि अभिजात संगीताबद्दल ओढ अधिक तीव्र वाटू लागली. जिथे संगीत तिथे पुलं हे समीकरण कळू लागले. इंद्रायणी काठी कसं घडलं ते कळलं, केसरबाई कशा प्रेमाने फटकारायच्या ते समजले, आणि बेगम अख्तर कशा बेहोश होवून गायच्या ते उमजले. पुलं - वसंतरावांची दोस्ती दिसली, भीमसेन ची पुलंच्या घरची पुण्यातली पहिली मैफिल दिसली आणि नारायणराव बालगंधर्वांवरची भक्ती दिसली. मल्लिकार्जुन आणि माणिक वर्मांचा परिचय झाला, वझेबुवांचा कष्टाचा इतिहास नजरे समोर आला आणि अब्दुल करीम खांसाहेबांची ‘ओडियन’ ची " पिया बिन" कानी घुमू लागली. पुष्प पराग सुगंधित मधील सुद्ध मध्यम किती सूक्ष्म रीतीने लागत आहे हे धुंडू लागलो आणी कुमार गंधर्वांची रामू भैय्या दात्यांकडे मैफील चालू आहे, भीमपलास चालू आहे, पुलं पेटीवर आहेत आणि मी समोर बसलो आहे असा जागेपणी भास होऊ लागला.
                       
कवितांच्या आनंद यात्रेत बुडून आयुषभर पती पत्नीने एवढे समाज कार्य आणि दान धर्म केला पण कुठेही वाच्यता नाही केली. म्हणूनच वाटते हा विदुषक नव्हता, होता एक राजा आणि त्याची होती एक आनंदाची अद्भूत नगरी, जणू काय - सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्…. गडकऱ्यांनी ‘राजसन्यास’ मध्ये साबाजीच्या च्या तोंडी वाक्य घातले आहे. " थोरले महाराज जाऊन आज इतके वर्षे झाली पण त्यांच्या नावाची नशा काही उतरत नाही". अशीच पुलंच्या नावाची नशा काही अजून उतरत नाही. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाला त्यांनी सांगितले होते कि जर कधी त्यांचा पुतळा बांधला गेला तर त्या खाली एवढेच लिहावे - ह्या माणसाने आम्हाला हसवले. तर मी असे लिहीन - ह्या माणसाने आम्हाला नुसते हसवलेच नाही, तर घडवले.!! पुलं म्हणाले होते की कोकणातल्या माणसांमध्ये कोकणातल्या फणसासारखा खूप खूप पिकल्या शिवाय गोडवा येत नाही. पण काही काही लोकांमध्ये तसा गोडवा त्यांच्या पाश्च्यातही अवीट असाच राहतो.

-- अभिताभ दिलीप होनप
ahonap@gmail.com
८-११-२०१५

1 प्रतिक्रिया: