Tuesday, May 7, 2024

नेपोलियन कुत्रा

माझ्या परिचयाच्या एका गृहस्थांचा कुत्रा फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो,असा त्यांचा दावा आहे. सिनेमातली गाणी सुरु झाली, की रेडियोवर "जंप घेऊन ऐक्चुली भुंकायला लगतो."! त्याच्या मालकीणबाईचेदेखील "आय सिंप्लि हेट फिल्म म्यूज़िक" असे आहे. कुठल्याशा दिगंबरबुवा पुढे आठवड्यातले तीन दिवस बसून त्या केदार, हमीर वगैरे मातब्बर मंडळींची आकंठ अब्रू काढीत असतात. समाजकल्याण ,बैडमिंटन, रमी, स्लिमींग, सिनेमे, आमचा शनिवार, गायन, बॉलरुम डान्सक्लास आणि ज्ञानेश्वरी एवढे सगळे एका आठवड्यात कोंबणाऱ्या ह्या शिष्या आणि ते दिगंबरबुवा यांचा केदार-हमीरांचा त्रिसाप्ताहिक आक्रोश ऐकुनही त्यांच्या नेपोलियनला (कुत्र्याचे नाव) आयुष्यात कशावरही भुंकण्याची वासना तरी कशी राहते, त्याचे तोच जाणे. मी जर कुत्रा असतो तर त्या घरात मुके जनावर हेच नाव सार्थ करीत राहिलो असतो.

बाकी ते नेपोलियन देखील नुसते भुंकतच असते. दुसरे एखादे स्वाभिमानी कुत्रे असते, तर त्याने गुरूशिष्या पैकी एकाच्या तरी नरड़ीचा घोट घेतला असता. हे फक्त भुंकते. एकदा मात्र आशाळभूतपणाने हा नेपोलियन आपल्या खिडकीतून समोरच्या मल्होत्रांच्या खिडकितल्या 'प्रिन्सेस'कडे डोळ्यांत केवळ कुत्रीच आणू शकतील इतके कारुण्य आणुन बघत बसलेला मी पाहिला होता. काही वेळाने त्याच्या डोळ्यात ते अवघ्या अभाग्याचे अश्रू इतके दाटले, आणि त्याच्या जिभेची लांबी इतकी वाढली, की हा आता लवकरच "चौधवी का चाँद...." म्हणायला सुरवात करतो की काय असे मला वाटले. पण तो शास्त्रोक्त संगीतवाला कुत्रा असल्यामूळे जोगिया रागात "पियाको मिलन की आऽऽसा" म्हणाला असता. मी गेल्यावर म्हणालाही असेल. हिंदी सिनेमातले नायक गायक झाले, की त्यांचा मिनिट्भर आधी नेमका अस्सा चेहरा होतो. हा नेपोलियन म्हणे लेबले पाहून रेकॉर्ड ओळखतो.

"नेपोलियऽऽन बडे गुलामअली आण!"

म्हंटल्यावर टेबलावरच्या दोन तीन रेकॉर्डसमधून शिंच्याने नेमका गुलामअली दातात धरुन आणलाही होता. पण बाई आत गेलेल्या पाहून हळूच मी टेबलावरच्या उरलेल्या रेकॉर्डस पाहिल्या, त्याही गुलामअलीच्याच होत्या. ही जादू करुन दाखवण्यात त्यांनी मला फसवले, स्वत:ला फसवले की नेपोलियनला ते मला अध्यापही कळलं नाही. त्या नंतर नेपोलियन दिगंबरबुवाच्या तराण्याची हुबेहुब नक्कल करतो हे ऐकुन मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. कारण दिगंबरबुवा आजपर्यंत, कित्येकवर्ष भुंकण्याचीच नक्कल करुन त्याला तराणा म्हणत आले आहेत.

- पाळीव प्राणी
पु. ल. देशपांडे