Friday, November 10, 2017

अजरामर भाई

"अमेरिकेतील माझा विमानवेडा मित्र उत्पल कोप्पीकर तेरा-चौदाव्या वर्षांपूर्वीच आपले छोटे विमान घेऊन आकाशात भराऱ्या मारायचा .मलाही विमान चालवायला शिकवायचा. त्याने चंग बांधला आणि मीही क्षणाचा पायलट आणि अनंतकाळचा पाय लटलट झालो".

या आणि अशा असंख्य शाब्दिक कोट्या ,असंख्य पु.लंचे किस्से मराठी माणूस रोज वाचतो ,रोज तरतरीत होतो.

8 नोव्हेंबर 1919 रोजी गावदेवी पुलाखालच्या हरिश्चंद्र गोरगावकर रस्त्यावरील कृपाल हेमराज चाळीत दुपारी 2.40 वाजता आख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या विनोदी साहित्य शारदेच्या कंठातील कौस्तुभमणीचा जन्म झाला.

पु.ल.देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके भाई. एक बहुरंगी, बहुढंगी, रंगतदार,गमतीदार, व्यक्तिमत्त्व. या जादूगाराने ज्या ज्या कलेला आपला परिसस्पर्श केला त्या त्या कलेला शंभर नंबरी सोनं बनवलं.मग तो चित्रपट असो, एकपात्री प्रयोग असो,प्रवासवर्णन असो,कथा असो अथवा संगीत असो.

अमाप ग्रंथसंपदा
पुलंनी विनोद,व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, नाटक,असे चौफेर लेखन करून साहित्य वर्तुळात आपले नाव कायमचे कोरून ठेवले आहे.

अपूर्वाई(प्रवासवर्णन),असा मी असा मी(कारकूनाची आत्मकथा),आम्ही लटिके ना बोलू(एकांकिका संग्रह),एका कोळियाने (हेमिंग्वे याच्या old man and the sea याचा अनुवाद),गोळाबेरीज(विनोदी लेखसंग्रह),वयं मोठं खोटम्।(बालनाट्य),व्यक्ती आणि वल्ली(साहित्य अकादमीचा पुरस्कार),वाऱ्यावरची वरात(व्यक्तिचित्रे),..........अशी असंख्य न मोजता येणारी साहित्य संपत्ती पुलंच्या मालकीची आहे.

चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान

पुलं हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते.चित्रपटात कधी भुमिका,कधी पटकथा, कधी संगीत,, कधी संवाद अशा सर्व बाजू ते यथार्थपणे सांभाळत असत.

कुबेर,मोठी माणसे, मानाचं पान, देवबाप्पा, गुळाचा गणपती,एक होता विदूषक, जोहार मायबाप, पुढचं पाऊल, चिमणराव गुंड्याभाऊ,.......अशा एकुण तीसेकच्या वर चित्रपटात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

संगीतकार पु.ल.
'संगीतात रमलेला साहित्यकार'म्हणून पुलंची अनेकदा ओळख करून दिली जाते.त्यांचे गाणे हे त्यांच्या खळखळत्या विनोदी झऱ्यासारखे उत्स्फूर्त आणि आतून येणारे होते.ते श्रेष्ठ दर्जाचे स्वररचनाकार होते.संगीताबद्दलच्या आपल्या आवडीबद्दल ते म्हणतात,

"संगीताबद्दलची माझी उपजत आवड लक्षात आल्यावर माझ्या वडिलांनी मला पेटी आणून दिली.आपण पेटीवादनात गोविंदराव टेंबे व्हावे या जिद्दीने मी पेटी वाजवत सुटलो.पेटी वाजवण्याच्या या नादातून मी जरी गोविंदराव टेंबे झालो नाही तरी उत्तम श्रोता मात्र झालो".

सुनीताबाई आणि पु.ल.-
पुलंचा विवाह 12 जून 1946 रोजी रत्नागिरीत झाला.त्यानी वर्णन केलेला या विवाह सोहळ्याचा किस्साही खुसखुशीत आणि वाचण्याजोगा आहे.सुनीताबाई पुलंना सर्वार्थाने साथ देणाऱ्या होत्या.पुलंच्या मागे त्या प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभ्या होत्या.आपल्या पत्नीविषयी पुलं म्हणतात,

"एका संपन्न् आणि बुद्धिमान घराण्यातील स्त्रीला माझ्याशी संसार करावा असं का बरं वाटलं असावं?पंचावन्न रुपयांमध्ये सहा सात जणांचा गाडा ओढणाऱ्या मला त्यावेळी नाव,यश यातलं काही नव्हते.त्यानंतरचा प्रवास मात्र आमच्या दोघांचा आहे.मला एकट्याला त्यातून निराळा काढताच येणार नाही...,"

अजरामर भाई
भाईंची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणसांमधील असलेली कणव यामुळे त्यांच्या साहित्यात सर्वसामान्य जनतेला आपलेच प्रतिबिंब आढळते.साहित्यावर प्रेम करणारी अमाप मराठी मने पुलंच्या साहित्याच्याच अंगाखांद्यावर खेळून प्रतिभावान बनलेली आहेत.समोरच्या माणसाला त्याच्या गुणदोषांसहीत स्वीकारण्याची शक्ती पुलंच्या साहित्यातील पात्रे आजही देतात.आजही पुलंचा विनोद हसता हसता नकळतपणे डोळे ओले करतो. आजही भाई तुमची व्यक्ती आणि वल्ली मधील सर्व पात्रे आम्हाला या माणसांच्या गर्दीत सोबत करतात.
नंदा प्रधान,नारायण,मंजुळा, बापू काणे,
गंपू, चितळे मास्तर ह्या व्यक्ति आमच्या मनात अजरामर झाल्या आहेत.

भाई ,तुम्ही नसल्याची जाणीव आम्हाला कधीच होत नाही. तुम्ही आहात इथेच.तुमचे साहित्य,विनोद ,किस्से,नाटकें, एकपात्री प्रयोग,वक्तृत्व याद्वारे तुम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबर असाल. भाई ,तुम्हाला मृत्यू नाही.तुम्ही अमर आहात.

12 जून 2000 हा दिवस आम्ही आमच्या स्मृतिपटलावरून केव्हाच पुसून टाकला आहे...

~~ गीता जोशी
https://www.facebook.com/GeetaJoshi1978

0 प्रतिक्रिया: