Friday, November 28, 2014

बारा जूनचे लग्न - सर्वोत्तम ठाकूर

माझी मोठी बहीण माईनं, म्हणजे त्या वेळची सुनीता ठाकूर हिनं, स्वत:चं लग्न स्वत:च ठरवलं. आज यात काही विशेष वाटणार नाही. पण 1945-46च्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळात ही बंडखोरी मानली जाई. मात्र, माईची ती बंडखोरी नव्हती. कारण बंड कोणाच्या तरी कडव्या विरोधात असतं. माईचे पुरोगामी विचार आम्हाला पटोत वा न पटोत, ती जे पाऊल टाकेल ते विचारानेच टाकेल, आततायीपणा करणार नाही, ही घरच्या सर्वांची भावना असल्यामुळे नापसंतीची शक्यता होती, पण कडव्या विरोधाचा प्रश्नच नव्हता.

आपल्या लग्नाला घरची पसंती आहे, ही बातमी माईने मुंबईला जाऊन भाईंना सांगितली. त्या वेळी रत्नागिरीत एकही टेलिफोन नव्हता. आणि असता, तरी मुंबईला भाईंच्या घरी फोन कुठला असायला? रत्नागिरीला आमच्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न करायचं ठरलं. नोंदणी पद्धतीने करायच्या या लग्नात अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळायचा, असं भाई आणि माई या दोघांचंही मत असल्यामुळे त्या वेळी प्रचलित असलेल्या बर्‍याच गोष्टी केल्याच नाहीत. आपल्या लाडक्या मुलीकरिता अप्पा हवा तेवढा खर्च करायला तयार होते; पण वधू-वरांनाच तो नको होता. म्हणून घरोघर जाऊन प्रतिष्ठितांना आमंत्रणं दिली नाहीत की लग्नपत्रिका छापल्या नाहीत. पण या आमंत्रणपत्रिका न छापण्याचा मात्र एक निश्चित फायदा झाला. कारण शेवटी ठरलेल्या दिवशी लग्न झालंच नाही. तेरा जून ही लग्नाची तारीख ठरली होती.

मला वाटतं तो गुरुवार होता. मुहूर्त पाहावयाचा नसल्यामुळे अप्पांच्या कोर्टातील कामाच्या दृष्टीने तो सोयीस्कर दिवस असावा. नुकताच कॉलेजात गेलेला मी, त्या वेळी विद्यार्थी परिषद की कसला तरी जिल्हा कार्यवाह होतो आणि एका बैठकीकरिता मालवण-वेंगुर्ला भागात जाणं मला आवश्यक होतं. आता तीन तासांत होणार्‍या त्या प्रवासाला तेव्हा एक दिवस लागत असे. माईचं लग्न तेरा जूनला आहे, म्हणून बारा जूनला परत यायचं ठरवून मी दोन दिवसांकरिता गेलो आणि ठरल्याप्रमाणे बारा जूनला संध्याकाळी रत्नागिरीला परतलो.

उद्याच्या लग्नाच्या वेळी काय काय मदत लागेल याचा विचार करत घरी आलो, तर माझे मेहुणे पु. ल. देशपांडे गप्पा मारत बसले होते.

लग्न दुपारीच होऊन गेलं होतं. लग्न झाल्याचा आनंद होता, पण प्रत्यक्ष लग्न चुकल्याचं थोडं वाईट वाटलं. मग समजलं, की दुपारी कोर्टाचं काम लवकर संपलं, तेव्हा आप्पांनी त्यांच्या साक्षीदार म्हणून येणार्‍या दोन मित्रांना उद्या येण्याची आठवण करून दिली. पाहुण्यांची आप्पांनी भार्इंशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांना समजलं, की या तिघांपैकी एक लग्ननोंदणी करायला आलेले रजिस्ट्रार आहेत आणि दुसरे दोघे लग्नाला साक्षीदार म्हणून सही करायला आलेले आप्पांचे वकील मित्र आहेत. आपलं लग्न उद्या नसून आजच, आताच आहे, याची भाईंना तेव्हा जाणीव झाली. माईलासुद्धा.

शेवटी नवरी मुलगी पांढर्‍या खादीच्या साडी-पोलक्यात, नवरा मुलगा पायजमा-शर्टमध्ये आणि घरातच असल्यामुळे चपला वगैरे पादत्राणं न घालता अनवाणीच, असे दोघे मेड फॉर इच अदर पोशाखात लग्नाला उभे राहिले होते, म्हणजेच सह्या करायला रजिस्ट्रारसमोर बसले होते.

तेरा जूनच्या ऐवजी बारा जून 1946लाच सुनीता ठाकूर व पु. ल. देशपांडे यांचं लग्न झालं. भाईंना मी प्रथम भेटलो, आमची गट्टी जमली ती त्यांचं लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी. त्यांचा मेहुणा म्हणूनच.

लग्नात आप्पांनी भाईंना एक अंगठी दिली. आप्पांवरच्या प्रेमाने भाईंनी ती आनंदाने स्वीकारली. ‘एवढा चांगला तुझ्या मनासारखा नवरा मिळाला, तेव्हा त्यांच्याकरिता तरी आता त्या कपाळावर कुंकू लाव’ आईच्या तिच्या नेहमीच्या पद्धतीने माईला फर्मावलं अणि माई परत कुंकू लावू लागली.

माई कुठलाच दागिना घालत नसे, पण आईने तिच्याकरिता एक मंगळसूत्र केलं होतं. त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, सुनीता ठाकूर आता कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून सुनीता देशपांडे झाली.

आईने मंगळसूत्र दिल्याचं पाहिल्यावर भाईंना तेव्हाच आठवण झाली, की त्यांनी तो विषय जाणूनबुजून काढला नव्हता, माहीत नाही, पण ते म्हणाले, त्यांच्या आईने पण सुनीताला (माईला भाई नेहमीच सुनीता म्हणत) एक मंगळसूत्र दिलं आहे अणि मुंबईहून आणलेल्या त्यांच्या सामानातून त्यांच्या आईने सुनेला दिलेलं मंगळसूत्र काढून आणून त्यांनी माईला दिलं.

एक अंगठी, दोन मंगळसूत्रं आणि तीन साड्यांच्या साक्षीने असं हे लग्न पार पडलं. आधी ठरवलेल्या दिवसाच्या एक दिवस आधी. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे खास लग्नाचा असा झालेला सर्व खर्च वधूपक्षानेच केला. वधूपक्षाने न म्हणता वधूने स्वत:च केला म्हणणं अधिक बरोबर होईल. वधू-वर, रजिस्ट्रार आणि दोन साक्षीदारांची सही करावयाचा तो सरकारी कागद - ‘‘नोंदणी पद्धतीने लग्न झाले’’ याच्या पुराव्याचा कागद माईने स्वत: आठ आणे म्हणजे अर्धा रुपया देऊन विकत आणला होता. या आठ आणे खर्चात लग्न पार पडलं होतं. माईने - वधूने - स्वत: केलेल्या खर्चात.

लग्नानंतर दोन-तीन दिवस भाई रत्नागिरीला राहिले. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 13 जूनला आप्पांनी मित्रमंडळींना चहाला बोलावलं आणि जावयांची ओळख करून दिली. हा चहाचा कार्यक्रम आमच्या रत्नागिरीच्या घरात (सदानंद निवास) हॉलमध्ये दुपारी झाला. त्याला वकील, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक वगैरे आप्पांचे वीस-पंचवीस मित्र आले होते. लग्न झाल्यानंतर कार्यक्रम ठरवला की तेरा तारखेला लग्न होणार होतं म्हणून त्याप्रमाणे आधीच ठरवला होता, हे मात्र मला माहीत नाही. जावई गातात आणि त्यांच्या दोन ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्यात, हे आता सर्वांना माहीत झालं. रत्नागिरीसारख्या छोट्या गावात ही एक अभिमानाने सांगण्याची गोष्ट होती. दुसर्‍या दिवशी रात्री आमच्या घरातल्या त्याच हॉलमध्ये भाईंचं गाणं झालं. मग सकाळच्या बसने भाई-माई हे देशपांडे कुटुंब रत्नागिरीहून मुंबईला गेलं. आमच्या घरी त्या वेळी एक ग्रामोफोन होता. ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खान, के. एल. सैगल यांच्या गाण्यांच्या दहा-बारा रेकॉडर्स होत्या. हा ग्रामोफोन आणि त्या रेकॉडस भाईंना मुंबईला जाताना आम्ही दिल्या होत्या. लग्नाचा तो आहेर असावा. भाईंनी खूप आवडीने तो स्वीकारला होता. आठ आण्यांच्या खर्चात पार पडलेल्या त्या लग्नात एक अंगठी, दोन मंगळसूत्रं, तीन साड्यांत ही एक विलायती चीज वाढली होती. 12 जून 2000 रोजी भाईंचं निधन झालं. लग्नानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी.

(‘ग्रंथाली’च्या 13 जून रोजी 2014 रोजी प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम ठाकूर लिखित ‘रत्नागिरी ते आइनस्टाइन’ या पुस्तकातून साभार.)

-- सर्वोत्तम ठाकूर
८ जून २०१४
दिव्य मराठी

3 प्रतिक्रिया:

Anonymous said...

Ekka mast
lagnala jaaun aalo..........mast

Anonymous said...

Good to know. Very nice.

Kavita said...

tyana kll hot..lagn thata-matat honya peksha.. sansar uttamacha jala pahije